▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिले होते अपशब्द
गडचिरोली | रुपेश निमसरकार
चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानंतर आंबेडकरी संघटनांनी आक्रमक होऊन ठिकठिकाणी निदर्शने केली होती. अखेर पोलिसांनी आज एका युवकासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. सुमित जगदीश मंडल(१८) असे आरोपीचे नाव असून, तो चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथील रहिवासी आहे.
२१ फेब्रुवारीला सकाळी चामोर्शी-आष्टी मार्गावरील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर काळ्या रंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करणारे विधान लिहिल्याचे आढळून आले. ही वार्ता पसरताच वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आझाद समाज पार्टी व अन्य आंबेडकरी संघटनांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. शिवाय जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना भेटून आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १० तपास पथके तयार केली. या पथकांनी परिसरातील १० किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये शोध घेतला. यावेळी सुमित मंडल याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. त्याला सहकार्य करणाऱ्या अल्पवयीन मुलास बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचा तपास आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश, यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुल्हट, प्रतीक्षा वनवे आदींनी ही कारवाई केली.
