▪️मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने बजावली नोटीस
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
काँग्रेसचे गटनेते ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराने दखल केलेल्या याचिकेत निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकेवर न्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. काँग्रेसचे आमदार विजय नामदेवराव वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय मिळविला. याच मतदारसंघातून नारायण जांभुळे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार होते. निवडणुकीच्या दरम्यानही जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या शपथपत्रावर आक्षेप नोंदविला.
मात्र, न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर यात हस्तक्षेपास नकार देत त्यांना फटकारले. वडेट्टीवार यांनी ज्या मुद्रांकावर शपथपत्र सादर केले, तो त्यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केला आहे. वडेट्टीवार त्यावर शपथपत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मुद्रांक कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे. हा मुद्रांक पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला. मात्र, त्याचा उपयोग शपथपत्रासाठी करण्यात आला. त्यामुळे वडेट्टीवा यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
