देवळाली प्रवरा : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असून समाज व रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. ज्यावेळी संपूर्ण देशावर पारतंत्र्याचा अंधकार पसरलेला होता. स्वप्नामध्येही अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा विचार येत नव्हता. अशा प्रसंगी मासाहेब जिजाऊ व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या प्रेरणेतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघून ते साकार करण्याकरिता धडपड करणारे आणि आपले संस्कार, पराक्रम, संयम, युद्धनीती, धैर्य, गनिमी कावा, सूक्ष्म अभ्यास-नियोजन या गुण कौशल्यांच्या जोरावर यशस्वीरित्या साकार करून दाखवणारे त्या कालखंडातील एकमेव योद्धा म्हणून महाराजांकडे बघितले पाहिजे.
पुढील पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देउन सर्व गुण संपन्न-ध्येयवेडी, समर्पित पिढी निर्माण करण्याहेतू हा पराक्रम त्यांच्या ओठावर आणून काळजात पेरणे काळाची गरज आहे असे खपके म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मातृभूमीवर असलेले प्रेम, शेतकऱ्यांविषयीचे उदात्त्य विचार व त्या काळातल्या कृषी योजना तसेच प्रत्येक स्त्री मराठ्यांच्या घरातील देवता आहे ही स्त्रियांविषयी बाळगलेली भावना समाजातल्या अंतिम घटकापर्यंत पोहोचून आपापल्या क्षेत्रामध्ये आदर्श नेतृत्व, कर्तुत्व बहरावे असा भाव व्यक्त केला.
सकाळी देवळाली प्रवरा पंचक्रोशी मध्ये प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गायकवाड वाय. बी. यांनी केले. प्राचार्य श्री कडूस यांनी पाहुण्यांचा सत्कार केला व सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून महाराजांना अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थी मनोगतात लोहार ईश्वरी, खामकर लावण्या यांनी सहभाग घेतला. गीतमंच-पाळणा गीत गायन झाले तसेच बंडगर शौर्य, कदम शिवतेज, सूर्यवंशी वेदिका या शालेय विद्यार्थ्यांनी महाराजांवर उत्कृष्ट पोवाडा सादर केला. शिवगीत कुमारी भागवत श्रावणी व ग्रुप यांनी गायले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपप्राचार्य श्री जाधव के ए यांनी अध्यक्षीय शुभसंदेश दिला.श्री भालेकर आर. जे.यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.सी. ढोकणे यांनी केले.
