▪️टेकाडीतील जल जिवन कामाचा भ्रष्टाचार उघड
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
मूल तालुका म्हटलं की माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभा क्षेत्र. सुधीर मुनगंटीवार म्हणजे विकासाचा झंझावात खेचून आणणारा पुढारी. त्यांनी अनेक लोकोपयोगी विकासकामे खेचून आणली.त्यातच सरकार कडून जलजीवन मिशन गावागावात राबविण्यात येत आहे. मुल तालुक्यातील टेकाडी गावात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावकरी लोकांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय होण्यासाठी सौर उर्जेवर चालणार्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. मात्र हे काम करण्याची जबाबदारी राजकीय जोरावर राजकारणी ठेकेदारावर देण्यात आली. शासनामार्फत घेतलेल्या या कामात ग्रामसेवक व अभियंता यांच्यात आर्थिक मिलीभगत व्यवहार करून या कामाचे बिल जास्त काढण्यात आले तर काम मात्र कमी करण्यात आले. त्यामुळे शासनाला फसवण्याचे काम अभियंता व ग्रामसेवक करीत असल्याचा आरोप करीत टेकाडी वासीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी या बोगस कामाची चौकशी करुन संबधितावर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांना व आमदार मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.
मूल तालुक्यातील टेकाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ सौरऊर्जेवर आधारीत पिण्याच्या पाण्याची यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी जनसुविधा योजने अंतर्गत जवळपास 5 लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. सदरचे काम टेकाडी ग्राम पंचायतनी कोणतीही निवीदा न काढता, मूल येथील एका पेटी कंत्राटदाराला हाताशी धरून काम केलेले आहे. अंदाजपत्रकानुसार जवळपास 190 फुट खोदकाम करणे आवश्यक होते, मात्र कंत्राटदाराकडून ग्रामसेवीका आणि शाखा अभियंत्यांना कामातील टक्केवारी वाढवुन देण्याचे आमीष दाखविल्यामुळे अभियंत्यानेही मोजमाप पुस्तिकेमध्ये 60 मीटर खोदकाम केल्याचे दाखविण्यात आले आहे. वास्तविक गावातील नागरीकांच्या माहितीप्रमाणे केवळ 120 फुट खोदकाम करण्यात आलेले आहे. तर केसींग 55 मीटर टाकण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे ते सुध्दा कमी टाकलेले आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर आधारीत पिण्याच्या पाण्याची यंत्रणा प्रस्थापित करण्याच्या कामाची तात्काळ चौकशी करावी व दोषी राजकारणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार अशोक उईके, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी मुल, तहसीलदार मूल, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल यांच्याकडे केलेली आहे.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन कोणती कारवाई केली जाते याकडे ग्रामस्था़चे लक्ष लागले आहे.
