▪️वारीसभाईला मिळाली होती मायेची ममता
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
आई आणि मुलाचे नाते हे सर्वांत खास आणि नि:स्वार्थी नाते मानले जाते. चिमुर शहरातील आझाद वार्डातील सोळा वर्षापूर्वी ताटातुट झालेल्या मायलेकाची पुन्हा भेट झाली. छाया विनयक भैसारे असे आईचे नाव आहे. ती नागपूर शहरातील बाजारातून आई हरवली होती.
छाया भैसारे यांना डोक्याचा आजार होता. मनोरूग्ण असल्याप्रमाणे त्या वागत होत्या. त्यामुळे आईवर नागपूरात चांगल्या डॉक्टरांकडे उपचार व्हावेत, अशी मुलाची इच्छा होती. सदर महिलेचे दोन जावई हे बुट्टीबोरी येथे राहत होते. सोळा वर्षांपूर्वी मुलाने आईला नागपूरला उपचारासाठी नेण्याचे ठरविले. सर्वप्रथम त्याने आईला बुट्टीबोरी येथे जावयाकडे नेले. त्या दिवशी तेथे बाजार असल्याने त्याच बाजारात आई छायाबाई दिसेनासी झाली. प्रचंड शोधाशोध केली. मुलगा व जावयाने बु्ट्टीबोरीस परिसर पालथा घातला. परंतु आईचा पत्ता लागला नाही. तो दिवस आई आणि मुलाच्या ताटातुटीचा दिवस ठरला. तेव्हा आई ही ५६ वर्षाची होती. त्यानंतरही मुलाचे आईला शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते, परंतु यश आले नाही. पाहता पाहता सोळा वर्षाचा कालावधी झाला.
चार दिवसांपूर्वी चिमुरचा राजेश तायडे नावाचा व्यक्ती खडगाव येथे कंपनीच्या कामासाठी गेला होता. खडगाव नागपूर अमरावती मार्गावरीकल वाडी पासून १२ किमी अंतरावर आहे. गाव इंडस्ट्रिअयल भागात आहे. तायडे हे काही कामानिमित्य गावात थांबले. एक हॉटेलमध्ये ही महिला त्याला दोन दिवस दिसली, त्याने तिला ओळखले. ती महिला छायाबाई प्रमाणे दिसत होती. ती महिला चिमूरचीच असल्याचा संशय आला. त्या हॉटेल मालकाला विचारणा केली असता ती बाहेर गावची असल्याचे सांगितले. तिला विचारणा केली, असता तिने चिमूरचे असल्याचे सांगितले. यावेळी मनोरूग्णाचा त्रास तिला जाणवला नाही. त्यांनी लगेच मुलगा संजय भैसारे यांना फोनद्वारे माहिती दिली. आई खडगावात असल्याचे सांगताच मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने पुन्हा खात्री करून लगेच खडगाव गाठायचे ठरविले. सदर व्यक्तीने छायाबाईबद्दल पूर्ण माहिती घेऊन मुलाला सांगितली.
वारीसभाईला मिळाली होती मायेची ममता
बुट्टीबोरी येथून निघून गेल्यानंतर छायाबाई फिरत फिरत खडगावात पोहचली. येथे आल्यानंतर तिचे या ठिकाणी कुणीच ओळखीचे नव्हते. कुठे राहायचे, काये खायचे असे अनेक प्रश्न तिच्या पुढे होते. ती गावातच मिळेल ते काम करू लागली. तीन ते चार वर्ष तिने मिळेल ते काम केले. शांत स्वभावाची, प्रमाणिकपणे ती काम करीत असल्याचे वारीसभाई नामक व्यक्तीच्या लक्षात आले. वारीभाई हे खडगावातीलच. त्याचा टायर पंक्चर दुरूस्तीचा छोटासा व्यवसाय आहे.
खडगावात त्या व्यक्तीच्या दुकानाजवळ ती महिला नेहमी दिसायची. तीन-चार वर्षानंतर वारीसभाईने त्या आईच्या वयाची असलेल्या महिलेला स्वत:च्या घरी ठेवून घेतले. आईप्रमाणे तिला दर्जा दिला. छायाबाईच्या रूपाने वारीसभाईला मायेचा आधार मिळाला. पाहता पाहता दहा वर्ष छायाबाईचे वारीसभाईच्या घरी गेले. स्वत:च्या दुरावलेल्या मुलानंतर वारीसभाई व छायाबाईमध्ये आई आणि मुलाचे नाते समृध्द झाले. चार दिवसापूर्वीच मुलगा संजय भैसारेने आईला घरी आणले. छायाबाई आता आपल्या कुटूंबात रममाण झाली आहे. दहा वर्षापासून वारीसभाई आणि छायाबाईमध्ये मायलेकाचे नाते निर्माण झाल्याने तिच्यासाठी वारीसभाईच्या घराचे दरवाजे सदैव खुले असल्याचे निरोप देताना वारीसभाईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
