▪️ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना विशेष सोय; आठ महिने पदे रिक्त, अर्थकारणाचा करिष्मा
नागपूर | रुपेश निमसरकार
राज्याच्या वन विभागात अंदाधुंद कारभार सुरू असून, महत्त्वाची पदे आठ महिने रिक्त ठेवल्यानंतर नवख्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अनुभव नसतानाही महत्त्वाच्या पोस्टिंग वन मंत्रालयातून मिळाल्या आहेत. मोठे अर्थकारण या पोस्टिंग मागे दडल्याची मोठी चर्चा आता होत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा २०१९ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत भरती झालेल्या ४१ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय प्रशिक्षणाचा कालावधी २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्यानंतर या आरएफओंना नियमित पदस्थापना देण्यात आली. कार्यासन अधिकारी वी. श. जाखलेकर यांच्या आदेशाने संबंधित आरएफओंना कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र, व्याघ्र प्रकल्प आणि सामाजिक वनीकरणातील पदे रिक्त ठेवण्यात आले असून, केवळ क्रीम पोस्टिंग नवख्या आरएफओंना देण्यामागचा हेतू अर्थकारणाशी निगडित असल्याची चर्चा होत आहे.
३१ आरएफओंना प्रादेशिकमध्ये पोस्टिंग
४१ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपैकी ३१ जणांना प्रादेशिकच्या पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. मे २०२४ पासून या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या, हे विशेष. कारण परिविक्षाधीन काळ संपणार असल्यामुळे या नवख्या आरएफओंसाठी अगोदर जागा बुक केल्या होत्या. त्यामुळे मे २०२४ मध्ये महत्त्वाच्या या सर्व जागा भरण्यात आल्या नाहीत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मेहकर, अहेरी, पिंपळनेर, धारूर, येवला, जत, पंढरपूर आदी परिक्षेत्राची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. प्रादेशिक उपविभागात पोस्टिंग मिळविण्यासाठी नवख्या आरएफओंनी मंत्रालयात अगोदरच आपले वजन खर्ची घातले. केवळ ८ जागा या वन्यजीव उपविभागातील असून, अद्यापही काही पदे रिक्त ठेवून प्रादेशिक उपविभागात पदे भरण्यात आली.
लक्ष्मीदर्शनामुळे लाभ
आठ महिने जागा रिक्त ठेवण्यामागचा हेतू समोर आला आहे. सेवेत दिवस उजाडलेल्या आरएफओंना ‘लक्ष्मीदर्शन’ मार्गे वन विभागात सहज पोस्टिंग मिळते. प्रादेशिक उपविभागातील दरारा, अर्थकारण याची भुरळ पडलेल्या नवख्या आरएफओंना प्रादेशिकमध्ये संधी देण्यासाठी मे महिन्यात सोय करण्यात आली. परिविक्षाधीन काळ संपल्यानंतर मनासारखी पोस्टिंग त्यांना देण्यात आली. त्याकरिता पडद्या मागची सूत्रे अगोदरच हलविण्यात आली होती.
वन्यजीव विभागात केवळ ४ जणांना पोस्टिंग
परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नुकतीच पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना यादीवर नजर टाकल्यास केवळ ८ आरएफओंना वन्यजीव उपविभागात पदस्थापना दिल्या गेली. राज्याच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३० च्यावर आरएमओंची पदे रिक्त असून, ती गत आठ महिन्यापासून भरण्यात आली नाहीत.
