लोणार(बिबी) | भागवत आटोळे
मांडवा येथील सैनिक भालचंद्र खुशालराव तारे यांनी देशाची 24 वर्ष सेवा करून झाल्यावर घरी परतत असताना गावात नागरी सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
बिबी पासून जवळच असलेल्या मांडवा गावाची ओळख म्हणजे फौजी मांडवा म्हणून ओळख आहे . गाव जरी छोटासे असलं तरी कीर्ती महान आहे या गावांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने आनंदाने एकजुटीने राहतात तसेच सर्व धर्मीयांचे प्रार्थना स्थळे या गावांमध्ये आहेत .त्यामुळे या गावांमध्ये एकीचे दर्शन घडते. या गावांमध्ये 40 ते 50 माजी सैनिक आहेत. हाच वसा घेऊन मांडवा येथील 60 ते 70 तरुण देशसेवा करण्यासाठी सीमेवर कार्यरत आहेत. कार्य करत शत्रुशी झुंज देत असताना योगेश दराडे हा जवान शहीद झाला असतानाही मांडवा येथील तरुणांनी देशसेवेची जिद्द सोडली नाही. असे असताना दरवर्षी एक ना एक सैनिक सेवानिवृत्त होऊन गावी येत असतो. तर एक दोन नवीन भरती होत असतात त्यामुळे सीमेवर जात असताना गावकरी त्याचे औक्षण करून आशीर्वाद देतात. तर सेवानिवृत्त होऊन घरी मायदेशी मातृभूमीत आल्यावर सुद्धा मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत देशभक्तीपर गीत नारे देऊन मोठ्या उत्साहाने गावकरी फुलांची उधळण करून स्वागत सत्कार समारंभ करत असतात 2 फेब्रुवारी रोजी भालचंद्र तारे सेवानिवृत्त होऊन घरी परतत असताना ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत महिला, पुरुष यांनी मोठ्या उत्साहात औक्षण करून भारत माता की जय ,वंदे मातरम ,जय जवान जय किसान असे देशभक्तीपर गीत व नारे देऊन स्वागत करण्यात आले व भारत मातेच्या फोटो प्रतिमेचे तसेच शहीद जवान ,महापुरुषांच्या, संतांच्या, फोटो प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त सैनिक भालचंद्र तारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी उपस्थिती दर्शवून देश सेवा करून आलेल्या तारे कुटुंबीयांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला. यावेळी माजी आमदार तोतारामजी कायंदे हे सुद्धा उपस्थित राहून सैनिकाचा सत्कार केला. यावेळी राजू कुहीटे सरपंच , तेजराव लोढे पोलीस पाटील,गावातील व परिसरातील आजी, माजी सैनिक , लहान मुलं ,मुली ,महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप तारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी मोरे प्राध्यापक यांनी केले.
