मूल | रमेश माहूरपवार
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील वॉर्ड क्रमांक 12 मधील रस्ते आणि नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वॉर्डातील प्रशांत मोरे यांच्या घरापासून प्रकाश गिरडकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि शरद नागोसे यांच्या घरापासून रमेश माहूरपवार यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. लाकडाऊन काळात या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले मात्र सध्यास्थितीत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांना यामुळे खूप त्रास होत आहे.
या रस्त्यांच्या एका बाजूला असलेल्या नालीची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. नालीमध्ये कचरा आणि घाण साचून राहिल्यामुळे पाणी व्यवस्थित वाहू शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला नालीच नसल्याने या बाजूच्या घरातील, शौचालयाचे घाणपाणी रस्त्यावर येऊन त्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येते आणि घरांमध्ये शिरते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते आणि आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.
या समस्येबाबत नागरिकांनी अनेकवेळा नगरपालिकेला निवेदन दिले आहे, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरला आहे.
या संदर्भात बोलताना, वॉर्डातील रहिवासी प्रकाश गिरडकर यांनी सांगितले की, “आमच्या वॉर्डात रस्ते आणि नाल्यांची समस्या अनेक वर्षांपासून आहे. आम्ही अनेकवेळा नगरपालिकेला निवेदन दिले आहे, पण त्यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे.”
या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची वाढ झाली असून, त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार होत आहे. तसेच, दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तिचे निराकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
