▪️आरोग्यासंबधीत किडनी, हृदयाशी खेळ
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
कॅन तसेच बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. आता कॅन मध्ये ‘इथिलिन ग्लायकॉल’ नावाचा घातक कृत्रिम द्रव पदार्थ वापरला जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कॅन चे पाणी त्वरित थंड करण्यासाठी हा पदार्थ सर्रासपणे वापरला जात असून, यामुळे किडनी तसेच हृदयाचे गंभीर आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याने, या अवैध धंद्याला जणू काही बळच मिळत आहे.
लग्नकार्य तसेच विविध सोहळ्यांमध्ये कॅन च्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अवघ्या ३० रुपयांत २० लिटर स्वस्त आणि थंड पाणी मिळत असल्याने कॅन चे पाणी खरेदीकडे यजमानांचा कल असतो. मात्र, या पाण्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून कॅन सा विचार केला जात नसल्याने, प्रकल्पधारकांकडून नफा कमाविण्याच्या हेतूने कॅन चे पाणी त्वरित थंड करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. वास्तविक, पाण्यावर प्रक्रिया करून ते ‘चिलर’ मशीनमध्ये थंड केल्यानंतर कॅन मध्ये भरले जाते. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने, काही प्रकल्पधारक त्यास फाटा देत, थेट पाण्यात इथिलिन ग्लायकॉल नावाचा घातक द्रव पदार्थ टाकून पाणी थंड करण्याची प्रक्रिया करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून, किडनी तसेच हृदयावर गंभीर स्वरूपाचा परिणाम करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा भरातील कॅन प्रकल्पांवर धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पाण्यामुळे होणारे परिणाम
इथिलिन ग्लायकॉल मिश्रीत पाणी पिल्यानंतर उलटी-मळमळ होण्याचा त्रास उद्भवतो. जेवणानंतर लोक पाणी पित असल्याने, अन्नपदार्थांमधील तेलकटपणामुळे उलटी, मळमळ होत असल्याचा नागरिकांकडून परस्पर निष्कर्ष काढला जातो. मात्र, इथिलिन ग्लायकॉल मिश्रित पाण्यामुळे हा त्रास उद्भवत असून, पुढे किडनी आणि हृदयाचे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होतो.
प्रशासनाची टोलवाटोलवी
राज्यातील बहुतांश कॅन प्रकल्पांमध्ये इथिलिन ग्लायकॉल मिश्रित पाणी लग्नसोहळ्यात पुरविले जात असून, प्रशासनाने कॅन प्रकल्पांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई कोणी करावी, यावरून प्रशासनातच टोलवाटोलवी सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मते, अन्न सुरक्षा व मानके कायद्यामध्ये केवळ सीलबंद पाण्यावरच कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. कॅन वर कारवाईचे अधिकार महापालिका, नगरपंचायत प्रशासनाचे आहेत. तर महापालिका व नगरपालिका, नगरपंचायत मते, ग्रामीण भागात त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीकडून कारवाई व्हायला हवी.
काय आहे इथिलिन ग्लायकॉल?
इथिलिन ग्लायकॉल हा एक कृत्रिम द्रव पदार्थ असून, त्याचा वापर अँटिफ्रीझ, कूलंट, डी-आयसिंग सोल्युशन आदीसाठी केला जातो. इथिलिन ग्लायकोल हे गंधहीन असून, ते पाण्यात सहजतेने मिसळते. त्याची चव गोड असते. इथिलिन ग्लायकाॅल जेव्हा पाण्यात मिसळविले जाते, तेव्हा पाण्याची घनता कमी होते. तसेच ते पाणी दूषित करू शकते. इथिलिन ग्लायकॉलचा वापर प्रामुख्याने आॅटोमोबाइल्स आणि एअर-कंडिशनिंग सिस्टीममध्ये कूलंट म्हणून केला जातो.
असा केला पर्दाफाश
प्रकल्पधारक : कॅन प्रकल्पांत ‘चिलर’ मशीन बसवायचे झाल्यास, दीड ते दोन लाखांपर्यंतचा खर्च येतो. याशिवाय पाणी थंड करण्याची प्रक्रियाही खर्चिक असल्याने, इथिलिन ग्लायकॉल स्वस्त आणि मस्त ठरते
प्रकल्पधारक : कॅन मध्ये पाणी भरण्या अगोदर इथिलिन ग्लायकॉल पाण्याच्या टाकीत मिसळले जाते. त्यानंतर जार भरले जातात. २० लिटरचा जार ३० रुपयांपर्यंत दिला जात असल्याने, इथिलिन टाकल्यानंतर तो अधिक परवडतो.
प्रतिनिधी : जिल्ह्यात कुठे हे प्रकार सुरू आहेत?
- कॅन प्रकल्प टाकणे सोपे झाल्याने घरोघरी प्रकल्प सुरू आहेत. शहरापासून सुरू होणारे प्रकल्प जिल्हाभरात सुरू आहेत. सुमारे शेकडो प्रकल्प सद्यस्थितीत सुरू आहेत. यातील किती प्रकल्पांमध्ये इथिलिनचा वापर होतो, हे सांगणे मुश्किल असले तरी, याचे प्रमाण अधिक आहे.
(नाव न छापण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधीचे कॅन प्रकल्पधारकाशी साधलेला संवाद)
