■ ८८ हजार कोटींची देयके थकली
लोकवार्ता टीम मुंबई
सुमारे ८८ हजार कोटी रुपयांच्या थकीत देयकांसाठी राज्यातील ३ लाख कंत्राटदारांनी गेल्या बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून, सरकार निश्चित प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यात सरकारने कामाचा सपाटा लावला होता. ही कामे आर्थिक निधीच्या तरतुदींपेक्षा जास्त होती. त्यामुळे, विधिमंडळात पुरवण्या मागण्या सादर करून सरकारला आर्थिक तरतूद करावी लागली होती. ही तरतूद केल्यानंतरही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा लोकप्रिय घोषणांचा आणि त्याच्या आर्थिक मदतीचा सपाटा सुरू झाल्याने सरकारवरील आर्थिक बोझा आणखी वाढत गेला.
राज्यात झालेल्या विकासकामांच्या देयकांचा आकडा ८८ हजार कोटींच्या घरात गेला आहे. कंत्राटदारांच्या संघटनांनी सरकारला त्याची अनेकदा आठवण करून देऊनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने कंत्राटदारांनी ५ फेब्रुवारी २०२५ पासून कामबंद आंदोलन सुरू केले. मंगळवारी या आंदोलनाचा सातवा दिवस आहे.
सरकारने निवडणुकीपूर्वी संवंग घोषणा करून राज्यातील मतदारांना योजनांची आमिषे दिली. ती पूर्ण करण्यासाठी विकासकामांचे पैसे तिकडे वळवले. त्यामुळे, आता ही देयके चुकती करायला शासनाला हात आखडता घ्यावा लागत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्या चर्चेसाठी वेळ नाही. निवेदने देऊन आम्ही थकलो आहोत – मिलिंद भोसले, अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना
