• जिल्हातील अनेक तालुक्यात प्रकार : विभागाचे दुर्लक्ष
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
रेशन दुकानात रेशनचा काळाबाजार होऊ नये, रेशन वेळेत व त्याच महिन्यात उपलब्ध व्हावे, रेशन दुकानात लाभार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक रेशन दुकानात दक्षता समितीची नेमणूक केली जाते. मात्र, जिल्ह्यात अनेक तालुका पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील दुकानामध्ये दक्षता समित्या निव्वळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
रेशन दुकानात गावपातळीवर ग्रामपंचायत च्या माध्यमातून दक्षता समितीची निवड केली जाते. मात्र, तालुक्यातील काही गावांमध्ये दक्षता समिती अध्यक्ष, सचिव, सदस्य निवडल्याच गेल्या नाहीत. तर कुठे नामधारी दक्षता समित्या असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष, सचिव, सदस्य अशी अशासकीय पद असलेले दक्षता समिती स्थापन करण्यात येते. मात्र समितीची बैठक होत नाही.
ही असतात दक्षता समितीची कामे
शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही हे तपासणे, बनावट, खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे, गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये दक्षता समितीमार्फत पार पाडली जातात.
हे असतात समिती सदस्य
अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष, सचिव, सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी, अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता पदाधिकारी यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा बैठक आवश्यक आहे.
