भंडारा : मनोज चिचघरे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे (दि. 25 जाने.) आमदार अभिजितदादा वंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्व निवेदन देण्यात आले.
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापन केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जवाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडवड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली ? मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसन्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही, आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे, जनतेची ही भावना महत्वाची आहे. आज दिनांक २५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे ही विनंती.
यावेळी यांच्यासह राजुभाऊ पालीवाल, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री बोरकर, जि. प. सभापती रमेश पारधी, जि. प. सभापती स्वातीताई वाघाये, पुजा ठवकर, स्मिता मरघडे, गायत्री वाघमारे, भारती कावळे, नंदा मोगरे, स्वाती बोंबले, प्रमोद मानापुरे, अभिजित वंजारी, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, रवी थोटे, योगराज झलके, किशोर राऊत, कन्हैया जांगळे, योगेश गायधने, प्रमोद कटरे, कान्हा बावनकर, शमीम शेख, राजु निर्वाण, पृथ्वी तांडेकर, महेमुद खान, दिपक मेंढे, गोपाल पंचभाई, मुलचंद ईश्वरकर, जगदीश उईके, राजेश हलमारे, अजय चवळे, राजेश मेश्राम तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
