चंद्रपूर | रुपेश निमसरकार
मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायत बहुमताने भाजपच्या ताब्यात असतांना येथील काॅंग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या काही सदस्यांना हाताशी धरून भाजपच्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता ,त्यावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आज दिनांक १७.०१.२०२५ रोजी मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते .
मात्र या बैठकीत एकूण १३ सदस्यांपैकी फक्त ५ सदस्य उपस्थित राहिल्याने हा प्रस्ताव आपोआपच बारगळला गेला आहे ,कारण प्रस्ताव पारित करण्यासाठी किमान ७ सदस्यांनी उपस्थित असणे अनिवार्य होते. हा प्रस्ताव काॅंग्रेसच्या पदाधिकारी यांनी भाजपच्या काही सदस्यांना हाताशी धरून दाखल केला होता मात्र भाजपचे या क्षेत्रातील आमदार व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या प्रयत्नानंतर आज शेवटी काॅंग्रेस पदाधिकारी आवश्यक संख्याबळ जमवू न शकल्याने हा प्रस्ताव बारगळला गेला आहे.
याबाबत मूल शहरात व तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून काॅंग्रेसला हा एक मोठा झटका मानला जात आहे ,तर भाजपसाठी एक विजयी दिवस असल्याने भाजप गोटात आनंदाचे वातावरण आहे.
