बांबू मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर : पिण्यासाठी नाल्याचे गढूळ पाणी
चंद्रपूर : रुपेश निमसरकार
तब्बल चार दशकानंतर चंद्रपूरच्या जंगलातील बांबूला फुलोरा आल्यामुळे बांबू मृतपाय होत आहे. नवीन बांबूची पेरणी केल्यानंतर चार वर्षांनी बांबूचे उत्पादन सुरू होते. फुलोऱ्यावर आलेला बांबू मुळासकट सुकतो. तो तसाच उभा राहिल्यास जंगलातील वणव्यास कारणीभूत ठरतो.तर वाळलेला बांबू पावसाच्या पाण्यात कुजून नष्ट होणार असल्याने शासनाला बांबू उत्पादनापासून मिळणारे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे या बांबूची कटाई करण्याचे ऑनलाइन कंत्राट वनविभागाकडून काढण्यात आले असून वनक्षेत्रात बांबू कटाई युद्धस्तरावर सुरू आहे. बांबू कटाईसठी प्रांतीय तसेच परप्रांतीय मजुरांना आणण्यात आले आहे. या मजुरांचा मुक्काम जंगलात नाल्याच्या शेजारी आहे. कारवा जंगलात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुराचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याने जंगलातील बांबू कटाई मजुरांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चारही विभागात वाघांची संख्या वाढली आहे. वाघांच्या हल्ल्यात माणसांचा व जनावरांचा दिवसागणिक बळी जात आहे. वाघांची दहशत सर्वत्र पसरली असताना जंगलात बांबू कटाई करण्याचे काम वन विभागाने ठेकेदाराकडे सोपविले आहे. बांबूतोड करणारे मजूर कुटुंबासह घनदाट जंगलात मुक्कामाला आहेत. जंगलात ताडपत्रीच्या तंबूत मुलाबाळांसह दिवसरात्र घालवित आहेत. पिण्यासाठी जंगलातील नाल्याचे गढूळ पाणी वापरत आहेत. पोटाची खळगी भरून पावसाळ्याच्या चार महिन्याची तजवीज करण्याच्या आशेने जीव हातावर घेऊन बांबू कटाईच्या कामात मजूर व्यस्त आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असताना कधी कोणता हिंस्त्र प्राणी हल्ला करणार, याचा नेम नसतो. बल्लारपूर वनक्षेत्रात कारवा जंगलात बांबू कटाईच्या कामात गुंतलेल्या मजुरावर वाघाने अलगद हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे मजुराचे कुटुंब उघड्यावर आले असून, मजुरांना सुरक्षात्मक कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. जंगलात काम करणाऱ्या मजुरांना आरोग्याची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, गावात राहण्याची व्यवस्था व जंगलात ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध करणे व जंगलागतील मजुरांना पुरेशी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे काम ठेकेदारांचे आहे. मात्र, अशी कोणतीही कार्यवाही ठेकेदार करीत नाही. मजुरांना वाऱ्यावर सोडण्याचे काम ठेकेदाराकडून होत आहे. ठेकेदारावर नियंत्रण ठेवणारे वन अधिकारीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आपली जबाबदारी झटकत आहेत.
एफडीसीएमच्या जंग़ात बांबूतोड नाही
मध्य चांदा वनविकास महामंडळाचे जंगल कन्हारगाव अभयारण्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू जंगल आहे. या जंगलातील बांबू फुलोऱ्यावर येऊन रांझ्या सुकल्या आहेत. येथील बांबू कटाई करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, हा अनुत्तरित प्रश्न आहे. या बांबूची तोड झाली नाही तर उन्हाळ्यात वणव्यात जंगल जाळून खाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जंगलातील वाघासह प्राण्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
