■ यंदा जि. प. व पं. स. निवडणूक गाजणार
▪️चिंतलधाबा, देवाडा खुर्द जिल्हा परिषद गटात सत्ताधारी व विरोधकांची मोर्चेबांधणी
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
गेल्या अडीच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयामुळे बल्लारपूर विधानसभेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे असलेले चिंतलधाबा व देवाडा खुर्द जिल्हा परिषद गट आहेत. या दोन्ही जिल्हा परिषद गटावर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे व राहुल संतोषवार यांनी या गटाचे जिल्हा परिषदेत नेतृत्व केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकांसाठी नव्याने गट, गण रचना आणि आरक्षणही जाहीर करण्यात आले होते.
मात्र जिल्हा परिषद, चंद्रपूर त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडी पायउतार झाली. त्यानंतर राज्यात नव्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्यास तत्कालीन महायुतीस असणारे प्रतिकूल वातावरण कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते. मात्र, आता राज्यात पुन्हा महायुतीला मोठे यश मिळाले असून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवार निवडणूक मोर्चेबांधणी करू लागले आहेत. येत्या काही महिन्यात चिंतलधाबा व देवाडा खुर्द या जिल्हा परिषद गटात पुन्हा निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस पक्ष अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा सत्तेसाठी जोरदार संघर्ष होणार आहे. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक लक्षात घेता यावेळी या गटात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. त्यामुळे या गटात काँग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सोपी नाही. यापूर्वी चिंतलधाबा व देवाडा खुर्द जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून भाजपाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आता पुन्हा या भागातील विविध प्रश्न आणि त्याबरोबरच स्थानिक विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या अग्रस्थानी असतील. त्यातच भाजपाचे नेते, माजी वनमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीपासून बल्लारपूर तालुक्यात विशेष लक्ष घातले आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष व मताचे ध्रुवीकरण झाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून मुनगंटीवार चौथ्यांदा आमदार झाल्याने काँग्रेस नेत्यात राजकीय बळ असणार की नाही, याबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात आहेत. काँग्रेस नेत्यांना पाठबळ मिळाले तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार असून काँग्रेससह इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राजकीय अस्तित्वासाठी कस लागणार आहे.
आरक्षणाची रचना नवी की जुनीच याची प्रतीक्षा
चिंतलधाबा, देवाडा खुर्द या दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीचे आरक्षण आधीच जाहीर झाले आहे. मात्र आता आरक्षण बदलणार की तेच कायम राहणार, याचा विचार न करता भाजपा, काँग्रेस, वंचित, शिवसेना, मनसे आदी पक्षातील इच्छुकांची मोठी यादी आहे. जुन्या रचनेनुसार निवडणूक होणार की नव्याने रचना होणार, आरक्षण कुणाचे निघणार, याकडे लक्ष न देता जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत पोहोचण्यासाठी संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मिनी मंत्रालयाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत इच्छुकांनी मोर्चेबांधणी करीत गावखेडे पिंजून काढत आहेत.
निवडणुकीत गाफील असलेले काँग्रेस नेते. दुसऱ्या तिसऱ्या फळीतील काँग्रेस पदाधिकारी सावध झाले आहेत. मात्र, आता पराभूत उमेदवार संतोषसिंग रावत व घनश्याम मूलचंदनी हे काँग्रेस नेते, आ. सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या यंत्रणेच्या विरोधात संघर्षात उतरलेले असल्याने होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
