▪️किटाळी जंगलातील घटना
भंडारा | मनोज चिचघरे
गेल्या काही दिवसांपासून लाखनी तालुक्यातील आणि साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंडिपार/सडक ते मिरेगावकडे जाणाऱ्या मार्गावर वाघाची दहशत निर्माण झाली आहे. याच वाघाने किटाळी जंगलातील मार्गावर भरधाव जाणाऱ्या दुचाकीवर हल्ला केला. यात दुचाकीवरील दोघे जण खाली पडून जखमी झाले. वन विभागाने सदर वाघाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
आठवडाभरापूर्वी भंडारा वनक्षेत्रातील कवलेवाडा येथील शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन ठार केले होते. या घटनेनंतर कवलेवाडा गावात मोठा जनक्षोभ उसळून वन विभागाचे वाहन पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर त्या वाघाला जेरबंद करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच किटाळी जंगलात वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गिरोला येथील मनोज मेश्राम व त्यांचा मित्र दुचाकीने मुंडीपारकडे येत असताना या पट्टेदार वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाघ दिसताच दुचाकी अनियंत्रित होऊन दोघेही खाली पडले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने धूम ठोकली. या घटनेत मनोज मेश्राम गंभीररित्या जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. परंतु, वाघ निघून गेला होता. वन विभाग आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. खबरदारी म्हणून बरडकिन्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. त्यात वाघापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
रेस्क्यू टीम आणि पोलिस वाघाचा शोध घेत असून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. घटनास्थळी वनविकास महामंडळाचे वनाधिकारी देशमुख, साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरज गोखले, कर्मचारी बघेले, उईके, कुटारे, बडोले, कुंभरे, कोरे, गायधने, मते, वंजारी तर सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी भेट दिली.
वाघाचा धोका कायम
मिरेगाव ते मुंडीपार/सडक हे ८ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाने व्यापलेले असून या मार्गावरुन शाळकरी विद्यार्थी, शेतकरी तथा नोकरदार दिवस-रात्र ये जा करतात. नेहमीचा रहदारीचा रस्ता असून वाहतुकीचे साधन नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन मिळेल. त्या साधनाने प्रवास करावा लागतो. राज्य परिवहन विभागाने या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
