▪️नितीन गडकरींची माहिती; खासदार औद्याोगिक महोत्सवाचा समारोप
नागपूर | रुपेश निमसरकार
अत्यंत यशस्वी अशा खासदार औद्याोगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून विविध प्रकल्पांमधून साडेसात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्याोग सुरू होतील अशी अपेक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय अॅडव्हांटेज विदर्भ-२०२५ खासदार औद्याोगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार प्रफुल्ल पटेल आदींची उपस्थिती होती. भारताने औद्याोगिक क्रांती ४.० ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले असून औद्याोगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अशातच खासदार औद्याोगिक महोत्सवाच्या आयोजनातून विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे गौरवोद्गार पीयूष गोयल यांनी काढले.
समारोपीय कार्यक्रमाला आमदार चित्रा वाघ, आमदार राजेश वानखेडे, माजी खासदार अजय संचेती, उद्याोग सचिव पी. अनबलगन, संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मनोज सूर्यवंशी, आयआयएम संचालक डॉ. भीमराया मेत्री आदींची उपस्थिती होती.
असा आहे सामंजस्य करार
● आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य सरकारकडून उद्याोग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
● श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून १०० रोजगार निर्माण होणार आहे. राज्य सरकारकडून उद्याोग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
● ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरात होऊ घातलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोसमध्ये झाला होता.
नागपुरात ‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’
भारतातले सर्वात मोठे लॉजिस्टिक हब नागपूरमध्ये निर्माण होत आहे. यामुळे जगात कुठेही व कितीही निर्यात नागपुरातून होऊ शकेल. बडोदा येथील गती शक्तीची स्किल युनिव्हर्सिटी याचा अभ्यास करून ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव एआयडी चमूने दिला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यासाठी महाराष्ट्र सरकारने १०० एकर जागा द्यावी, असे निवेदन त्यांनी केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागा देण्याची घोषणा केली. त्यामुळे लवकरच नागपुरात ‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’ होणार हे निश्चित आहे. यातून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
नागपूर, अमरावती हे ‘मॅग्नेट क्षेत्र’ : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. विदर्भाच्या समग्र विकासाचा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे ‘मॅग्नेट क्षेत्र’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. आगामी क्षेत्रात पर्यटन आधारित कॉन्क्लेव्ह व्हावे असे ते म्हणाले.
